मंगरूळ नवघरेमध्ये बिबट्याचा हल्ला! १२ शेळ्यांचा फडशा; शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे गावात बिबट्याने गोठ्यावर हल्ला केला. यात
 तब्बल १२ शेळ्या ठार झाल्या आहेत .या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
  शेख अरिफ अमीर हमजा यांचा गोठा मंगरूळ-वरखेड रस्त्यालगत आहे. कुटुंबातील लग्नकार्यामुळे सर्वजण गावाबाहेर गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गोठ्यावर आले असता, त्यांनी आपल्या सर्व १२ शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या. शेळ्यांवरील खुणा आणि जखमा असल्यामुळे हल्ला करणारा प्राणी बिबट्याच असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.
वन विभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, बिबट्याचा वावर लक्षात घेता इतर शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान शेतकऱ्यांमध्ये या प्रकारामुळे भीतीचे वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे...