अवैध धंद्यांवर LCB ची मोहीम : ४९ आरोपींवर कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :
जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या अवैध देशी-विदेशी दारू विक्री, हातभट्टी व्यवसाय व मटका जुगार यावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जून महिन्यात धडक कारवाई करत ४९ आरोपींवर कारवाई केली असून, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशावरून ही मोहीम हाती घेण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत राबविण्यात आली. विशेषतः मलकापूर ग्रामीण हद्दीतील दाताळा टोलनाका परिसरात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या मोहन नयनसिंग जाधव याच्याविरुद्ध कारवाई करत २ लाख ८८ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच मेहकर, बोराखेडी, रायपूर, खामगाव, साखरखेर्डा, अंधेरा, बुलडाणा शहर व ग्रामीण, जानेफळ, बीबी आणि सिंदखेडराजा या ठिकाणी एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर, यशोदा कणसे, पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, दत्ता नरवडे, पंकज सपकाळे, सचिन कानडे, दिगंबर कपाटे, विजय पैठणे, रघुनाथ जाधव, विजय वारुळे, मनोज खरडे, हर्षल जाधव आणि समाधान टेकाळे यांनी सहभाग घेत महत्त्वाची भूमिका बजावली.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी (बुलडाणा) आणि श्रेणिक लोढा (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडली असून, आगामी काळात अशा कारवायांना आणखी गती देण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.