एलसीबी जोमात, गुन्हेगार कोमात ! कारवाईचे सत्र सुरूच; आता सोयाबीन , तुर चोरणाऱ्यांना ठोकल्या बेड्या !

 
Buldhana
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) स्थानिक गुन्हे शाखेने मागील आठ दिवसांपासून अनेक कारवाया केल्या असून, गुन्ह्यांची उकल केली आहे. सणोत्सवात गुन्हेगारी प्रवृत्तीला अंकुश लावण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.  धान्याचे गोडाऊन फोडून सोयाबीन, तूर चोरणाऱ्या तिघांना १७ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. 

जळगाव जामोद व शेगाव येथील चार गुन्ह्याची उकल करून सोयाबीन व तूर चोरणाऱ्या तिघांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले. गुन्ह्यात  वापरलेली टाटा  कंपनीची मालवाहू गाडी जप्त करण्यात आली आहे.  योगेश लक्ष्मण जोशी यांनी घटनेची तक्रार जळगाव जामोद पोलिसांत दिली होती.  आसलगाव रोडवरील  बुलढाणा अर्बन यांचे गोडाऊन अज्ञात चोरट्याने फोडले होते. त्यामधून १७ क्विंटल तूर चोरून नेल्याची तक्रारीत नमूद केल्या गेले. दरम्यान, प्रकरणाचा तपास सुरू होता.  तपासाच्या दृष्टीने गुन्हे शाखेने विशेष पथक नेमले होते.  त्या पथकाला मिळालेल्या  गोपनीय माहितीच्या आधारे  संग्रामपूर तालुक्यातून  आरोपींना अटक करण्यात आली. यांनतर, आरोपींची चौकशी केली असता,   जळगाव जामोद आणि शेगाव येथे चार गुन्हे उघडकीस आले.   आरोपी अर्जुन श्रीकृष्ण हनवते (32 वर्षे) रा. आस्वंद ता. संग्रामपूर, आकाश संतोष वानखेडे  (25 वर्षे) रा.पातुर्डा, अविनाश बाळकृष्ण मेहंगे (24 वर्ष) रा. आस्वंद असे आरोपीचे नाव असून आणखी दोन आरोपी फरार आहेत.   

कारवाई पथक.. 


पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात ,  बीबी महामुनी यांच्या  मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक लांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे, आशिष चेचरे, हवालदार दिपक लेकुरवाळे, चाँद शेख, राजू टेकाळे, ऐजाज खान, पोलीस नायक गणेश पाटील, हवालदार अजीस परसुवाले, चालक हवालदार विजय मुंढे, शिवानंद हेलगे या पथकाने ही कामगिरी केली.