रेती माफियांवर "LCB" चा दणका! मलगी फाट्यावर दोन टिप्पर पकडले; तब्बल ६० लाखांचा मुद्देमाल जप्त....
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मलगी फाटा परिसरात सापळा रचला. ६ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, दोन टिप्परच्या सहाय्याने विनापरवाना वाळूची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. मध्यरात्री सापळा रचून दोन्ही टिप्पर ताब्यात घेण्यात आले. यामध्ये टाटा कंपनीचा टिप्पर क्रमांक MH-28-BB-7556, टाटा कंपनीचा टिप्पर क्रमांक MH-14-MT-4933 आणि सहा ब्रास वाळू असा एकूण ६० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.
या कारवाईत संदीप लिंबाजी ढेंडे (वय २९, रा. देऊळगाव माही, ता. देऊळगाव राजा) आणि पवन देविदास मुरकुट (वय २७, रा. डोरडी, ता. सिंदखेड राजा, जि. बुलडाणा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) तसेच गौण खनिज अधिनियमातील कलम 21(1), 21(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या आदेशाने सपोनि सुनील इंगळे,पोहेकॉ. अनुपकुमार मेहर
पोको. विक्रांत इंगळे,सतीश नाटेकर,निवृत्ती पुंड यांनी ही कारवाई केली. वाळू चोरी आणि अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात पोलिसांनी उचललेल्या या धडक कारवाईमुळे अवैध वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत.