अवैध रेती तस्करांवर एलसीबीची धडक कारवाई; 88.40 लाखांचा एवज जप्त; सात बोटी, चार ब्रास रेती केली जप्त; देऊळगाव राजा पोलिसात गुन्हा दाखल !

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन आणि चोरटी वाहतूक रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक  निलेश तांबे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने मोठी आणि धाडसी कारवाई करत तब्बल 88 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 11 डिसेंबर 2025 रोजी देऊळगाव राजा पोलिस स्टेशन हद्दीतील सुलतानपूर शिवारातील संत चोखामेळा जलाशयात करण्यात आली.

 स्थानीय गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोनि. सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पथक जलाशय परिसरात दाखल झाले. तेथे काही व्यक्ती बोटींच्या सहाय्याने रेतीचे चोरटी उत्खनन व वाहतूक करत असल्याचे समोर आले. पोलिस पाहताच काही तस्कर दुसऱ्या बोटीने पळून गेले. दरम्यान, स्थागुशाच्या पथकाने आपल्या जिवाची पर्वा न करता पाण्यात उड्या मारून पोहत जाऊन एकूण ७ बोटी पकडल्या, तसेच रेती उत्खननासाठी वापरलेले साहित्य जप्त केले. यावेळी पथकाने सात बोटींसह पाण्याचे इंजिन, गॅस सिलेंडर, शेगडी, रेती/वाळू – 04 ब्रास व इतर साहित्य सर्व मुद्देमाल ताब्यात घेत देऊळगाव राजा पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आला. प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि गौण खनिज कायद्यानुसार गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू आहे.

 ही धडक कारवाई  निलेश तांबे — पोलिस अधीक्षक, बुलढाणा, श्रेणिक लोढा — अपर पोलिस अधीक्षक, खामगाव, अमोल गायकवाड — अपर पोलिस अधीक्षक, बुलढाणा, मनीषा कदम — उपविभागीय पोलीस अधिकारी, देऊळगाव राजा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.  पोनि. सुनील अंबुलकर (स्थानिक गुन्हे शाखा), पोउपनि. प्रताप बाजड, पोहेको शरद गिरी, पुरुषोत्तम आघाव, दिगंबर कपाटे, पोकॉ अमोल वनारे, निलेश राजपूत, मनोज खरडे, दीपक वायाळ, विकास देशमुख, निवृत्ती पुंड, तसेच देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे पोनि. ब्रम्हा गिरी व पथकाने ही कारवाई केली.