गुटखा माफियांविरुद्ध एलसीबीची धडक कारवाई सुरूच; मलकापुरात गुटख्याने भरलेली ओमनी कार पकडली; ६.३८लाखांचा मुद्देमाल जप्त; एका आरोपीस केली अटक..!

 
 मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गुटख्याची अवैधपणे वाहतुक आणि विक्री करणाऱ्यांवर  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून धडाकेबाज  कारवाई सुरूच आहे.  १८ सप्टेंबर राेजी एलसीबीच्या पथकाने मलकापूर शहरात गुटख्याने भरलेली ओमीनी कार जप्त केली. या प्रकरणी पथकाने एकास अटक केली असून त्याच्याकडून तब्बल ६ लाख ३८ हजार ९७० रुपयांचा एवज जप्त केला आहे. 

महाराष्ट्र शासनाने गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांवर घातलेल्या बंदीचा फज्जा उडवत मलकापूर शहरात ओमनी कारमधून गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.  एक जण आपल्या ओमनी कारमधून शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित पानमसाला व गुटखा मलकापूर शहराकडे विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती पथकाला मिळाली. 

त्यानुसार पथकाने मलकापूर शहर हद्दीत सापळा रचून ओमनी (क्र. एमएच-०२-एवाय-५०५६) कार पकडली. तपासाअंती कारमधून पाच लाख ५८ हजार ९७० रुपयांचा गुटखा व ८० हजार रुपयांचे वाहन असा एकूण सहा लाख ३८ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी रोख यासीन शेख रहेमान (वय ४४, रा. पारपेट,मलकापूर ) याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मलकापूर शहर पोलिस ठाण्याचे पथक करीत आहे.


ही कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत पाेलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळ, हेकाॅ एजाज खान, पाेकाॅ अमाेल शेजाेळे, अजिज परसुवाले,विक्रांत इंगळे, चालक पाेकाॅ शिवानंद हेलगे यांनी सहभाग घेतला.