उदय नगरच्या टोलनाक्याजवळ LCB ने पकडली इर्टिगा कार! कारमध्ये सापडला १३ किलो गांजा; चौघांना अटक...

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलीस दलाने अवैध धंद्यांच्या विरोधात मोहीम तीव्र केली आहे. तरुण मुले हल्ली मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जात आहेत, त्यातून गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे याच्या मुळाशी जात अंमली पदार्थांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश एसपी विश्व पानसरे यांनी LCB सह जिल्हा पोलिस दलाला दिले आहेत. यातूनच अमडापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत उदयनगर टोल नाक्याजवळ टीम LCB ने गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईत ९ लाख ८३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे..
 
   हरून नूर मोहम्मद (६७, चिखली), शेख सलीम शेख रज्जाक (३५, रा.खंडाळा, चिखली), राहुल पांडुरंग मोरे(४२, चिखली) व सत्यजित येवले(३२,चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून १३ किलो १४० ग्राम गांजा , इर्टिगा चारचाकी वाहन आणि ५ मोबाईल असा ९ लाख ८३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे उदयनगरच्या टोल नाक्याजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली..
यांनी केली कार्यवाही 
पोलीस अधीक्षक, विश्व पानसरे, अपोअ. खामगांव,श्रेणिक लोढा, अपोअ. बुलढाणा, बी.बी महामुनी, उपविपोअ. बुलढाणा सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोनि.अशोक एन. लांडे स्था.गु.शा. बुलढाणा, पोनि. सुनिल अंबुलकर जि.वि.शा. प्रभार स्थागुशा. बुलढाणा यांचे नेतृत्वात पोउपनि. सचिन कानडे, राजेश टेकाळे, अनुप मेहेर, पोना. विजय वारुळे, विजय पैठणे, पोकॉ. मंगेश सनगाळे, दिपक वायाळ, चापोकों. निवृत्ती पुंड, पो.अं. राजू आडवे यांनी ही कारवाई केली..