जमीन वर्गबदल प्रकरणात तलाठ्याने घातला भलताच घोळ; वर्ग २ ची जमीन केली होती वर्ग १! कायदा बसवला "धाब्यावर"! तलाठी निलंबित!
Dec 10, 2025, 11:20 IST
राहेरी(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा तालुक्यातील शिवनी टाका येथे वर्ग–२ शेतजमीन कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता वर्ग–१ मध्ये बदलून दुसऱ्याच्या नावावर नोंदविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गट क्रमांक १६३ मधील जमीन सुनिता शेषराव कोरडे यांच्या नावावर नियमबाह्य पद्धतीने नोंदविण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मूळ मालक भगवान बाबुराव दाभाडे यांच्या जमिनीचा वर्ग बदलणे हा थेट नियमभंग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तलाठी संजय चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे.
तपासात केवळ हेच प्रकरण नव्हे, तर निमखेड, बुटा आणि सिंदखेडराजा परिसरातील एकूण २० हून अधिक अनियमित फेरफार प्रकरणे उघड झाली आहेत. वारस नोंदी न तपासणे, परवानगीशिवाय नोंदी बदलणे, वर्गबदलासाठी बेकायदेशीर मंजुरी देणे, काही नागरिकांना हेतुपुरस्सर विलंब करणे अशा अनेक गंभीर त्रुटी नजरेस आल्या आहेत. महसूल अधिनियम १९६६, फेरफार नियम १९७९ आणि १९२८ च्या तरतुदींचे सरळ उल्लंघन झाल्याचे नोंदविण्यात आले आहे.
या प्रकरणाची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवा पुरंदरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विस्तृत पुराव्यांसह दाखल केली होती. तक्रारीत वर्गबदलासाठी आर्थिक देवाणघेवाणीचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या आदेशानुसार झालेल्या तपासात तलाठी चव्हाण यांनी नियमांचे उल्लंघन केले, नोंदींत छेडछाड केली आणि अनधिकृत मंजुरी दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार ४ डिसेंबर रोजी त्यांचे तत्काळ निलंबनाचे आदेश देण्यात आले.या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून, नियमभंग करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
