किनगाव राजा-सिंदखेडराजा महामार्गावर वृद्ध दाम्पत्याला ‘पोलिस’ म्हणून अडवले; चोऱ्यांची बतावणी करत दागिने काढायला लावले अन् नजर चुकवत २.१० लाखांचा सोन्याचा ऐवज लंपास!
मिळालेल्या माहितीनुसार, धनू मानसिंग पवार (वय ६८) आणि अनुसया धनू पवार (वय ६५), रा. वडगाव तांडा, ता. जि. जालना, हे रक्षाबंधनानिमित्त पांग्री उगले येथे आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर दोघेही एमएच २१ बीके २६७९ क्रमांकाच्या दुचाकीवरून आपल्या गावाकडे परतत होते.किनगाव राजा-सिंदखेडराजा मार्गावरील पेट्रोल पंपासमोरील पुलाजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी हात दाखवून पवार दाम्पत्याला थांबविले. ‘आम्ही पोलिस आहोत, परिसरात चोऱ्या होत आहेत,’ असे सांगत सुरक्षिततेच्या नावाखाली अंगावरील सोन्याचे दागिने काढून कापडात बांधून ठेवण्यास सांगितले.
समोरचे व्यक्ती पोलिस असल्याचे समजल्याने दाम्पत्याने त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला आणि अंगावरील दागिने काढले. यामध्ये अंदाजे ८ ग्रॅम वजनाची सोन्याची दाणी, किंमत सुमारे १ लाख २० हजार रुपये, तसेच ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, किंमत सुमारे ९० हजार रुपये, असा एकूण २ लाख १० हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज होता.
दागिने काढून घेतल्यानंतर अज्ञात दोघांनी नजर चुकवत हा ऐवज लंपास केला आणि घटनास्थळावरून दुचाकीने पोबारा केला. काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचे पवार दाम्पत्याच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
दरम्यान, नातेवाईकांनी किनगाव राजा महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. भरदिवसा महामार्गावर वृद्ध दाम्पत्याला पोलिस असल्याची बतावणी करून लुटल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या भामट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.