देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला! रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला जात असताना भरधाव एसटी बसची ज्येष्ठ नागरिकाला जोरदार धडक;

 गंभीर जखमी झालेल्या ६४ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू! मेहकर–सुलतानपूर महामार्गावरील दुर्दैवी घटना...

 
 मेहकर (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : देवदर्शन करून घरी परतण्याच्या प्रवासात काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना मेहकर–सुलतानपूर महामार्गावर घडली. लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबल्यानंतर रस्ता ओलांडून वाहनाकडे परतत असलेल्या ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला एसटी बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रमेश अश्रुजी मुंढे (वय ६४, रा. किनगाव जट्टू) असे मृताचे नाव आहे. ही घटना ६ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास मेहकर–सुलतानपूर महामार्गावरील मोगरा हॉटेलजवळ घडली. या प्रकरणी मेहकर पोलिसांनी अज्ञात एसटी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश मुंढे हे कुटुंबीयांसह दुधा ब्रह्मपुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर ते आपल्या वाहनाने घराकडे परतत होते. दरम्यान, शुक्रवारी (६ नोव्हेंबर) रात्री आठ वाजताच्या सुमारास मेहकर–सुलतानपूर महामार्गावरील मोगरा हॉटेलजवळ त्यांनी लघुशंकेसाठी वाहन थांबवले. रस्त्याच्या पलीकडे गेल्यानंतर ते पुन्हा वाहनाकडे परतण्यासाठी रस्ता ओलांडत होते. मात्र, याचवेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने त्यांना जोरदार धडक दिली.

धडक इतकी जोरदार होती की, रमेश मुंढे गंभीर जखमी झाले. अपघाताचा आवाज ऐकताच वाहनातील कुटुंबीयांनी तातडीने खाली उतरून त्यांच्याकडे धाव घेतली. डोक्याला जबर मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. देवदर्शनासाठी आनंदाने घराबाहेर पडलेल्या कुटुंबावर परतीच्या प्रवासातच दुःखाचा डोंगर कोसळला.दरम्यान, या अपघातानंतर मेहकर पोलिसांनी अज्ञात एसटी बसचालकाविरुद्ध शनिवारी (७ नोव्हेंबर) गुन्हा दाखल केला आहे. अपघात नेमका कसा घडला, याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. महामार्गावर रस्ता ओलांडताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.