खामगाव हादरले! रागाच्या भरात पतीकडून पत्नीची लोखंडी रॉडने हत्या; आरोपी ताब्यात
May 15, 2026, 15:28 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव शहरातील रेल्वे गेट परिसरात कौटुंबिक वादातून घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. रागाच्या भरात पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना १५ मेच्या मध्यरात्री उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे.
मृत महिलेचे नाव सौ. सविता प्रकाश सोळंके असे असून त्या खामगाव शहरातील रेल्वे गेट परिसरात वास्तव्यास होत्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती प्रकाश सोळंके याचे पत्नीशी काही कारणावरून जोरदार भांडण झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात त्याने घरातील लोखंडी रॉडने पत्नीच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला.
या हल्ल्यात सविता सोळंके गंभीर जखमी झाल्या असून त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी प्रकाश सोळंके याला ताब्यात घेतले.
या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.