खामगावातील सुपरवायझरची मलकापूर तालुक्यात हत्या! हात-पाय बांधलेल्या अवस्थेत विहिरीत आढळला मृतदेह; २ ऑगस्टपासून हाेते बेपत्ता; मलकापूर ग्रामीण पोलिसात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल..!
Aug 6, 2025, 15:54 IST
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : खामगाव एमआयडीसीत कार्यरत असलेल्या सुपरवायझरची मलकापूर तालुक्यातील धानाेरा शिवारात हत्या केल्याची घटना ५ ऑगस्ट राेजी उघडकीस आली. या सुपरवायझरचा हात आणि पाय बांधलेला मृतदेह विहीरीत आढळला आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घनश्याम रमेश भुतडा (वय ४८) असे मृतक सुपरवायझरचे नाव आहे.
खामगाव एमआयडीसीत हरेकृष्ण इंडस्ट्रीजमध्ये भुतडा सुपरवायझर म्हणून काम करीत होते.ते २ ऑगस्टपासून बेपत्ता झाले हाेते. त्यांचा शाेध घेण्यात येत असतानाच मलकापूर तालुक्यातील धानोरा शिवारात संजय पाटील यांच्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शेतातील विहिरीत भुतडांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी त्यांचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळले. यावरून त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. अज्ञात आरोपींनी खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना विहिरीत फेकले. याप्रकरणी नातेवाइक रवींद्र सुभाष भुतडा (रा.वरूड, ता. मोताळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पेालीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर भेट दिली. पुढील तपास मलकापूर ग्रामीण पाेलीस करीत आहेत.