आषाढी वारीत कवठळच्या वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू; चंद्रभागेत स्नान केले अन्....

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पंढरपूरच्या भक्तिरसात सहभागी होण्यासाठी गेलेल्या कवठळ येथील वारकऱ्याच्या अकाली निधनाने आषाढी वारीच्या वातावरणात शोककळा पसरली. रामदास निंबाजी पडघान (वय ४०) यांचा शनिवारी (५ जुलै) सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कवठळ गावातील भाविकांसोबत रामदास पडघान पंढरपूर वारीसाठी गेले होते. पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या गावातील मित्रांसमवेत चंद्रभागा नदीत पवित्र स्नान केले. त्यानंतर चहापाण्याचा अल्पविराम घेत असताना अचानक त्यांना अस्वस्थता वाटू लागली. तात्काळ मित्रांनी त्यांना जवळच्या दवाखान्यात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी हजर होऊन पंचनामा केला व मर्ग दाखल केला. दरम्यान, मृतदेह गावी नेण्यात आला आणि रात्री उशिरा त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या आकस्मिक निधनामुळे कवठळ गावात शोककळा पसरली आहे. कुटुंबाचा आधारवड हरपल्याने आई-वडील, पत्नी, भाऊ आणि दोन लहान मुलांच्या डोळ्यांत अश्रूच अश्रू आहेत. कर्त्या पुरुषाच्या अचानक जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अनेकांनी त्यांच्या सामाजिक कार्याची आणि प्रेमळ स्वभावाची आठवण काढत श्रद्धांजली वाहिली.