जळगाव जामोद तालुका हादरला; उटी बु येथे कुऱ्हाडीने वार करून पत्नीची हत्या; सतत अपमान करीत असल्याने संतप्त झालेल्या पतीने पत्नीला झोपेतच संपवले...

 
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :पत्नी सतत टोमणे मारून अपमान करीत असल्याने संतप्त झालेल्या पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. ही धक्कादायक घटना जळगाव जामोद तालुक्यातील उटी बु येथे 8 डिसेंबर रोजी पहाटे घडली.या घटनेमुळे जळगाव जामोद तालुक्यात खळबळ उडाली आहे.  लक्ष्मी पवन धुंदाळे (वय 24) असे मृतक महिले नाव आहे. तसेच पवन गजानन धुंदाळे (वय 28) असे आरोपी पतीचे नाव आहे. 
जळगाव जामोद तालुक्यातील उटी बु येथील पवन धुंदाळे यांची पत्नी लक्ष्मी ही पतीला टोमणे मारत होती. तू काही कामाचा नाहीस, कुठे जाऊन मर असं बोलून अपमान करायची. 7 डिसेंबरच्या रात्रीही तिने शिविगाळ केली. त्यामुळे संतप्त झालेल्या पवन धुंदाळे याने पत्नी लक्ष्मी ही झोपलेली असताना तिच्यावर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली. पिडीत विवाहितेचे सासरे गजानन धुंदाळे आणि सासू पुष्पा यांनी रात्री एक वाजता पोलीस पाटील संदीप गटमणे यांना घटनेची माहिती दिली. पोलीस पाटील गटमणे यांनी घटनास्थळाला भेट दिली असता लक्ष्मी ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली.   या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती पवन गजानन धुंदाळे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 

सात महिन्यांची श्रेया झाली पोरकी 
पती पत्नीच्या वाद टोकाला पोहचला. त्यातून पतीने पत्नीही हत्या केली. त्यामुळे, या दाम्पत्याची सात महिन्यांची मुलगी मात्र पोरकी झाली आहे. आईचा मृत्यू झाला तर वडील आता जेलमध्ये जाणार आहेत. त्यामुळे, सात महिन्यांची श्रेया आता आई आणि वडिलांच्या प्रेमाला मुकणार आहे.