जलंब पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!;मध्यप्रदेश कडून खामगाव'कडे येणारा वीस लाख किंमतीचा गुटखा जप्त..

 
 खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):मध्यप्रदेश कडून खामगाव कडे येणारा अवैध गुटखा आज सापळा रचून जलंब पोलिसांनी खामगाव - नांदुरा मार्गावरील लांजुळ फाट्याजवळ पकडला आहे.

आज दुपारी जलंब पोलिसांनी सापळा रचून अंदाजे वीस लाख किंमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे.या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत. जलंब पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मध्यप्रदेश कडून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला अवैध गुटखा नांदुरा मार्गे जलंब हद्दीतून खामगाव'कडे वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीवरून जलंब पोलिसांनी लांजुळ फाट्याजवळ सापळा रचून नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली होती. नांदुरा कडून खामगावच्या दिशेने येणारा टेम्पो क्रमांक एमएच ०९ ईएम ९९९४ ची तपासणी करून त्यामधून महाराष्ट्र शासनाने राज्यात बंदी घातलेला तंबाखूजन्य सुगंधित गुटखा आढळून आला होता. पोलिसांनी सदर वाहनाला ताब्यात घेऊन गुटखा जप्त केला आहे. वाहनाला जलंब पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे.अंदाजे वीस लाखांचा गुटखा पकडल्याची माहिती समोर येत आहे.हागुटखा मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात वाहतूक केला जात असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.