चिखलीत महावितरणचे भरारी पथक नव्हे, वसुली पथक! महिलांना एकटे पाहून पैसे उकळल्याची तक्रार;भरारी पथकातील अधिकाऱ्यांची चाैकशी करून निलंबीत करण्याची मागणी !

 अधीक्षक अभियंत्यांना माजी सैनिक संघटनेचे निवेदन...

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मिटर तपासणीच्या नावाखाली महावितरणचे भरारी  पथक महिला आणि नागरिकांकडून वसुली करीत  असल्याचा आराेप माजी सैनिक संघटनेने केला आहे. या पथकातील अधिकाऱ्यांची चाैकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी माजी सैनिक संघटनेने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.या पथकाने कुणाकडून किती रुपये घेतला याचा लेखाजाेखाच निवेदनात नमुद करण्यात आला आहे. तसेच हे पथक घरी एकटी महिला पाहून फाॅल्टी मिटर असल्याचे सांगून हजाराे रुपये उकळत असल्याचा आराेप निवेदनात करण्यात आला आहे. या आराेपामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

१७ जुलै २०२५ रोजी चिखली शहरात भरारी पथकाने काही घरी छापे टाकले. यावेळी कोणताही विद्युत फॉल्ट नसतानाही जबरदस्तीने ‘फॉल्ट आहे’ असे सांगून ५०,००० रुपये दंड भरण्याची धमकी देण्यात आली. दंड न भरल्यास १.५ ते २ लाख रुपये दंड तसेच फौजदारी कारवाई होईल, असे सांगून निकिता भगवान काळे या महिलेला धमकावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारकर्त्यांनी निवेदनात म्हटले आहे की , पथकात महिला कर्मचारी नसताना पुरुष कर्मचाऱ्यांनी थेट घरात घुसून पैशांची मागणी केली. याशिवाय, मागील काही महिन्यांत पथकाने रोख स्वरूपात लाखो रुपये वसूल केल्याचेही आरोप आहेत.


रवींद्र सखाराम काळे यांच्याकडून ₹६०,००० (बुलढाणा रोड, खामगाव चौफुली येथे), भगवान कारभारी थोरवे व संजय धोंडू जाधव यांच्याकडून ₹४०,०००,संजू भगवान सावळे यांच्या पत्नींकडून ₹५०,०००, राजू सखाराम काळे यांच्याकडून ₹५०,००० रुपये पथकाने घेतल्याचा गंभीर आराेप निवेदनात करण्यात आला आहे.  हे सर्व पैसे "दंड कमी करण्याच्या" नावाखाली दबाव व भीती दाखवून उकळले गेले. भरारी पथकाचे हे वर्तन अनैतिक व कायद्याच्या चौकटीबाहेरचे असून, विशेषतः महिला, सैनिक, शिक्षक, पोलीस आणि इतर जबाबदार नागरिकांच्या मानसिक छळाला कारणीभूत ठरले आहे.या पथकातील अधिकाऱ्यांची चाैकशी करून त्यांना निलंबीत करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बलरामेश्वर अशोक सोळंकी यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. निवेदनावर रविंद्र सखाराम काळे,  संजय धोंडू जाधव,४) संजू भगवान सावळे, विजय अशोक बुरकुल, किशोर चंपालाल चव्हाण, अंबादास भुसारी, राजेश्वर प्रल्हाद अवचार,  भगवान कारभारी थोरवे आदींसह इतरांची स्वाक्षरी आहे.