

म्हणे,तुमच्या घरावर तुमच्या मयत मुलाचा कोप झालाय..त्याची शांती करा ! नाहीतर तुझ्या वंशाचा नाश होईल' !
जादूटोणा करणाऱ्या शेळगाव आटोळच्या बाबांना न्यायालयाचा दणका; अघोरी उपचाराने मूल होत असल्याचा करायचा दावा...
चिखलीत आलेला एक बाबा लोकांना दुखातून मुक्ती मिळविण्यासाठी व मूल होत नसल्यास अघोरी उपचार करण्यास बाध्य करून पैसे उकळत असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार अंनिसच्या कार्यकर्त्या प्रतिभा भुतेकर (रा. गांधीनगर, चिखली) यांनी २७ एप्रिल २०१४ रोजी पोलिसांत फिर्याद दिली होती. बाबाचा भंडाफोड करण्यासाठी प्रतिभा भुतेकर या हरिदास बळकर याच्याकडे गेल्या आणि सांगितले की, मला दोन वर्षांपासून डोकेदुखीचा त्रास आहे. त्यावर बरेच इलाज करूनसुद्धा डोकेदुखी थांबत नाही. त्यावर आरोपी हरिदास बळकर उर्फ नागनाथ बाबा याने भुतेकर यांना उद्देशून सांगितले की, 'तुमच्या घरावर तुमच्या मयत मुलाचा कोप झाला आहे. त्याची शांती करावी लागेल. तसे न केल्यास तुझ्या वंशाचा नाश होईल' अशी भीती घालून डोकेदुखी थांबविण्याकरिता अघोरी उपाय करण्यासाठी त्यांच्याकडून पाच हजार रुपये घेतले. तसेच त्या भोंदू बाबाने सोबतच्या साक्षीदारांनासुद्धा मूलबाळ होत नसल्याने अघोरी उपाय केल्यास मूल होईल असे सांगून पाच हजार रुपये घेतले. दरम्यान, या प्रकरणी नागनाथ बाबा यांच्याविरुद्ध कलम २ (१) (ख) (५), ३ जादूटोणाविरोधी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गोकुळ भोई यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी हरिभाऊ देशिंगे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकारी वकील मोहंमद बशीर मोहंमद नसीर यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडत आरोपीला जादूटोणा कायद्यांतर्गत शिक्षा होण्याकरिता जोरदार युक्तीवाद केला. फिर्यादी व इतर अशा सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने आरोपी भोंदूबाबास एक वर्ष सश्रम कारावास आणि पंचवीस हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास, अशी शिक्षा सुनावली. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून हेड कॉन्स्टेबल गंगाधर दराडे यांनी सहकार्य केले.