

मलकापुरात पोलिसांचा धाक उरला नाही का? एका रात्रीतून फोडली ६ घरे....! ज्या घरांना बाहेरून कुलूप त्याच घरांना केले टार्गेट .....
Feb 3, 2025, 08:38 IST
मलकापुर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापुर शहर परिसरात गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुन्हे करणाऱ्यांची हिंमत वाढली आहे. छोट्या मोठ्या चोरीच्या घटना नित्याची बाब झाली आहे. आता पुन्हा राष्ट्रीय महामार्गाजवळील लक्ष्मी नगर परिसरात १
फेब्रुवारीच्या मध्यरात्री तब्बल सहा घरफोड्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे . त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. मलकापूर पोलिसांचा वचक आहे की नाही असा सवाल आता जो तो विचारू लागला आहे....
ज्या ६ घरांमध्ये घरफोडी झाल्याचे उजेडात आले आहे ती सर्व सामान्य कुटुंब आहेत. मध्य रात्रीच्या अंधारात १ ते १.३० च्या सुमारास लक्ष्मी नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी ज्या घरांना बाहेरून कुलूप आहे अशा घरांचा शोध घेऊन चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. यात अरुण तुकाराम नवथळे, भगवान दत्तात्रय भुजबळ, प्रभाबाई गुलाबसिंग शिंदे, शंकरराव सदाशिव जाधव, राजेंद्र दिनकर पाटील, रवींद्र खराडे यांच्या घरी चोरी झाली असल्याचे उघडकीस आले आहे. यात सोने, चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरीला गेल्याचे समोर आले आहे..
चोरी झालेल्यांपैकी अरुण तुकाराम नवथळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनी ईश्वर वर्गे यांच्या नेतृत्वात प्रशांत राठोड, आनंद माने, संतोष कुमावत व गजानन देवकर याबाबत पुढील तपास करीत आहेत.