शेतकऱ्यांचे पशूधन चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; १० गुन्ह्यांची उकल, ५.५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत..!
Aug 18, 2025, 16:20 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :जिल्ह्यात शेतकऱ्यांचे पशूधन लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (स्थागुशा) पथकाने जेरबंद केले आहे. या कारवाईत एकूण १० गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, ५० हजार रुपये रोख रक्कम, इनोव्हा कार, मोबाईल आदींसह एकूण ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्ह्यातील वाढत्या जनावर चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला सखोल तपास करून आरोपींना पकडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने विशेष नाकाबंदी करून ही कारवाई केली.
गोपाल साखरकर यांनी १३ ऑगस्ट राेजी त्यांच्या गोठ्यातील गाय लंपास झाल्याची फिर्याद दिली हाेती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुरे लंपास करणाऱ्यांविषयी माहिती मिळाली. त्यावरून पाेलिसांनी जाफ्राबाद रोडवर नाकाबंदी करून संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी केलेल्या १० गुरे चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.
पाेलिसांनी या कारवाईदरम्यान पाेलिसांनी रशीद शेख शफी (४५) रा. धुळे, शेख नदीम शेख जाबीर (२४) रा. सिल्लोड, सय्यद मोईन सय्यद अजीम (२५) रा. सिल्लोड,मोहम्मद कुरबान मोहम्मद अजीज (३५) रा. धुळे, शेख समीर शेख खलील (२८) रा. सिल्लोड या आराेपींना अटक केली. त्यांच्याकडून पाेलिसांनी राेख ५० हजार रुपये राेख आणि इनाेव्हा कार किंमत पाच लाख रुपये जप्त केले.ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या गुन्ह्यांची झाली उकल
पो. स्टे. चिखली ०१ गुन्हा, पो. स्टे. बुलढाणा ग्रामीण – ०२ गुन्हे, पो. स्टे. धाड – ०३ गुन्हे, पो. स्टे. रायपूर – ०३ गुन्हे, पो. स्टे. बुलढाणा शहर – ०१ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, उर्वरित फरारी आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पो. स्टे. चिखली करीत आहे.