मेहकरच्या घटनेची इनसाईड स्टोरी! घरच्यांना वाटलं बेपत्ता झाला; चार वर्षांनी हॉटेलच्या केबिन खालून साफळाच काढला! दोन मित्रांनी मिळून केला तिसऱ्याचा घात!
दरम्यान १७ एप्रिल रोजी निकिता सचिन उगले ही महिला मेहकर पोलीस ठाण्यात आली. पती सचिन उगले त्रास देत असल्याची तक्रार तिने पोलिस ठाण्यात दिली.. सचिन आणि निकिता पती पत्नी असून त्यांना २ वर्षांचा एक मुलगा आहे. मात्र कौटुंबिक वाद असल्याने निकिता सध्या माहेरी मेहकर येथेच राहते. कौटुंबिक वादातून सचिन दोन वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन गेला होता, तेव्हा देखील निकिताने पोलिस स्टेशन गाठले होते.त्यावेळी आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी चिमुकल्याला घेऊन निकिताच्या ताब्यात दिले होते..मात्र तरीही सचिनचा त्रास थांबत नव्हता, निकिता त्याच्या त्रासाने हैराण होती..
अन् गुपित उघडे पडले..
सचिन आणि निकिता काही काळ पती-पत्नी म्हणून सोबत राहिले होते. त्यामुळे विनोदच्या खुनाच्या बाबतीत पुसटशे निकिताला माहित होते.. जेव्हा जेव्हा वाद व्हायचे तेव्हा तेव्हा तो विनोदच्या खुनाचा संदर्भही देऊन निकिताला धमकावत होता. हीच बाब निकिताने मेहकर पोलिसांना सांगितली अन् इथुनच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली..पोलिसांनी सचिनवर पाळत ठेवली होती, पोलिस आपल्या मागावर असल्याचे लक्षात येतात सचिन उगले याने शरणागती पत्करली, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने घडलेल्या घटनेचा पोलिसांसमोर उलगडा केला...
नेमकं काय झालं..
आरोपी सचिन उगले याची मेहकर मोळा रस्त्यावरील जामगाव शिवारात एक हॉटेल होती. याशिवाय सचिनच्या व्याजाच्या पैशांचाही व्यवसाय होता. सचिनचे काही पैसे (नेमकी रक्कम समोर आली नाही) त्याचा मित्र सुनील जाधव याच्याकडे होते. सुनील देखील व्याजाचा व्यवसाय करायचा, सुनील चे व्याजाचे पैसे मृतक विनोद कडे होते. मात्र वारंवार मागणी करून विनोद कडून पैशांची परतफेड झाली नव्हती. दरम्यान विनोद हा,देखील दारू पिण्याच्या सवयीचा होता.. पैशांची मागणी केल्यावर तो शिवीगाळ देखील करायचा असे आरोपी सचिन उगले याने पोलिसांना सांगितले..
असा घटनाक्रम..
मृतक विनोद नवले २९ एप्रिल २०२२ रोजी कामावर जातो म्हणून घराबाहेर पडला होता. १ मे २०२२ रोजी त्याचे त्याच्या भावासोबत शेवटचे संभाषण झाले होते. त्यानंतर त्याचा संपर्कच झाला नव्हता. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार २ मे २०२२ रोजी सचिन उगले आणि सुनील जाधव या दोघांनी विनोदला सचिनच्या हॉटेलवर बोलावले. तिथे तिघांनी दारू मटणावर ताव मारला. पैशांच्या हिशोबावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि सचिन आणि सुनील जाधव या दोघांनी मिळून विनोदचा धारधार शस्त्राने खून केला. भर दुपारी ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती, दरम्यान या घटनेवेळी सचिनच्या त्या हॉटेलवर कुणीच नव्हते. त्यावेळी पुरावा नष्ट करण्यासाठी सचिन आणि सुनील या दोघांनी हॉटेलच्या केबिन खालीच एक गड्डा खोदला आणि त्यात विनोद चा मृतदेह पुरला. त्यावर सिमेंटचा गोबा करून सचिन तिथूनच हॉटेलचा व्यवसाय करत होता..
हा सगळा प्रकार आरोपी सचिनने पोलिसांना सांगितल्यानंतर मेहकर पोलिसांचे पथक जेसीबी आणि सचिनला घेऊन घटनास्थळी पोहोचले. आरोपी सुनील जाधव याला देखील अटक करण्यात आली..घटनास्थळी जेसीबी लावून उकरल्यानंतर विनोदच्या शरीराचा सांगाडाच बाहेर आला.. विनोद बेपत्ता होतेवेळी नोंदवलेली तक्रार आणि जमिनीत सापडलेले कपड्यांची अवशेष यावरून विनोद च्या कुटुंबीयांनी त्याची ओळखही पटवली आहे.. दरम्यान आता सचिन उगले आणि सुनील जाधव या दोघांनाही चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा यशस्वी तपास कर्तव्यदक्ष एसपी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व्यंकटेश आलेवार , लक्ष्मण कटक, प्रभाकर शिवणकर करीत आहेत..
दोन्ही आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे...
आरोपी सचिन उगले आणि सुनील जाधव दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. याआधी त्यांच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वीच आरोपी सुनील जाधव याच्यावर हॉटेलात वेश्याव्यवसाय चालवत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मेहकर शहरातील बायपास वरील हॉटेल एकांत येथे आरोपी सुनील जाधव वेश्याव्यवसाय चालवायचा..त्यावेळी पोलिसांनी छापेमारी करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता..