समृद्धी महामार्गावरील डिझेल चोरी करणाऱ्या गँगची इनसाईड स्टोरी! उर्वरित आरोपीही पोलीसांच्या गळाला; एक तर कपशीच्या शेतातील तुरीच्या पाट्यात लपला होता, पोलिसांनी असा लावला शोध....

 
समृद्धी
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणाऱ्या टोळीतील एकाला पकडल्याची घटना आज,१३ सप्टेंबरच्या सकाळी बिबी पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती. पोलीस पाठलाग करत असल्याने चोरट्यांची कार कठड्याला धडकून अपघातग्रस्त झाली होती. त्यातील चालक पोलिसांच्या हाती लागला होता, उर्वरित चोरटे पळून गेले होते. बिबी पोलिसांनी ३५ लिटरच्या १० कॅन जप्त केल्या होत्या. दरम्यान आता या प्रकरणात अपडेट माहिती समोर आली असून पोलिसांनी डिझेल चोरी करणाऱ्या गँगचा पर्दाफाश केला आहे. चालकासह एकूण ४ चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आधी अपघातग्रस्त वाहनातून चालक ज्ञानेश्वर फकीरबा सोसरे ताब्यात घेण्यात आले होते. आणखी ३ जणांसह समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करण्यासाठी आल्याची कबुली त्याने दिली. दरम्यान त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतांना शुभम दीपक उबरहंडे (२५, रा.चिखली) याला मलकापूर पांग्रा येथे पळून जातांना पोलिसांनी पकडले.त्याच्या चौकशीतून त्याने भैय्या नावाच्या एका आरोपीचे नाव सांगितले. या भैय्यानेच डिझेल चोरीसाठी सर्व साहित्य व गाडीची व्यवस्था केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. शुभम कडून पोलिसांनी भैय्या चा मोबाईल नंबर मिळवला...
तुरीच्या शेतात लपला होता भैय्या...
दरम्यान मोबाईल लोकेशन वरून पोलिसांना भैय्या चा पत्ता सापडला. मांडवा येथील भीमराव दगडू इंगळे यांच्या कपाशीच्या शेतातील तुरीच्या पाट्यात तो लपलेला होता. पोलिसांनी त्याला पकडले तेव्हा त्याच्या भुवयांना जखम झाल्याचे पोलिसांना दिसले. त्यानेही डिझेल चोरीची कबुली दिली. भैय्या चे नाव हर्षद पांडुरंग साबळे ( रा. डौलखेड, ता. जाफ्राराबाद) असे आहे. भैय्याच्या चौकशीतून त्याने त्याचा साथीदार शेळगाव आटोळ येथील संकेत सुनील बोर्डे याचे नाव सांगितले. संकेतला पोलिसांनी मलकापूर पांग्रा येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी बीबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या ताब्यातून ५० लिटर डिझेल, ईरटीका कार आणि प्लॅस्टिकच्या कॅन असा ७ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबी येथील ठाणेदार संदीप पाटील,पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर शिंदे, अशोक अंभोरे, नितीन मापारी, अरुण सानप ,यशवंत जैवाळ, भारत ढाकणे, रवींद्र बोरे यांनी ही कारवाई केली.