भरधाव ट्रकची इनोव्हाला जोरदार धडक;एक ठार, तिघे गंभीर जखमी:खामगावच्या सुदर्शन ढाब्यासमोर मध्यरात्री भीषण अपघात

 
 खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भरधाव वेगातील ट्रकने इनोव्हा कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात खामगाव–बाळापूर मार्गावरील सुदर्शन ढाब्यासमोर सोमवारी (दि. १९) रात्री साडेअकराच्या सुमारास झाला.
या अपघातात शेख समीर शेख अनिस (रा. खामगाव) याचा मृत्यू झाला असून, इकबाल खान, मोहम्मद फैजान व अकमल हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण खामगाव येथील रहिवासी असून, इनोव्हा कार (क्रमांक एमएच-०४-केडब्ल्यू-७५५२) ने जेवणासाठी जात असताना समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक जीजे-१३-एटी-८७७७ ने त्यांच्या वाहनाला धडक दिली.
अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी अब्दुल करीम अब्दुल रज्जाक (रा. खामगाव) यांच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी फरार ट्रकचालकाविरुद्ध बीएनएस कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब), ३२४ (४) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.