

वानखेड मध्ये मरणानंतरही छळले जाते! गावकरी म्हणतात स्मशानात जाण्यासाठी कुणी रस्ता देता का रस्ता...
Sep 8, 2024, 10:11 IST
वानखेड(स्वप्निल देशमुख:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावांत मोठी विदारक परिस्थिती आहे. इथे मरणानंतरही छळले जाते.. नरकयातना सोसाव्या लागतात.. होय, त्याला कारणही तसंच आहे..कारण स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे, तिथे जायला नीट रस्ता देखील नाही..
शासन विकासाच्या गप्पा मारत..मात्र गाव खेड्यात स्मशानभूमीच्या बाबतीत अनेक ठिकाणी विदारक चित्र दिसते. संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे अतिशय कठीण परिस्थिती आहे. पावसाळ्यात ज्या रस्त्याने पायी चालणे कठीण असते तिथे प्रेत कसे नेणार? एवढी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. स्मशानभूमीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो मात्र तरीही काम होत नसल्यामुळे नागरिकांमधून संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत...
कुणी रस्ता देता का रस्ता...
वानखेड या गावात गावापासुन ते नदी जवळच्या स्मशानात पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल असतो. या रस्त्यावरून चालणे म्हणजे तारेवरची कसरत. साधं पायी चालणे जिथं कठीण आहे त्या रस्त्यावरूण प्रेत कसं वाहुन नेणार...? मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम लोकप्रतिनिधी व कंत्राटदार यांनी केली आहे, अशी प्रतिक्रिया संदीप दमदार वानखेड यांनी दिली..