खामगाव तालुक्यात शेती साहित्य लंपास करणारी टोळी सक्रिय; आवार शिवारातील दोन शेतांतून मोटार, केबल, झटका मशीन लंपास; शेतकरी हतबल!
Aug 12, 2025, 15:49 IST
खामगाव (भागवत राऊत : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : खामगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून शेतीसाठी उपयुक्त साहित्य लंपास करणारी टोळी सक्रिय झाली असून, त्यांनी चोरीचा सपाटा लावला आहे. आवार शिवारातील दोन शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्य १२ ऑगस्ट रोजी चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले आहे. यामध्ये मोटार, केबल व झटका मशीन यांचा समावेश आहे.
आधीच नैसर्गिक आपत्ती आणि रोगराईमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे. या चोरट्यांचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शिवशंकर ठाकरे यांचे शेत खामगाव–मेहकर रस्त्यालगत असून, त्यांच्या शेतातील विहिरी व बोअरवर बसविलेल्या मोटारी चोरट्यांनी लंपास केल्या. तसेच शेतात लावलेली झटका मशीनही चोरीला गेली. आवार शिवारातीलच गवई यांच्या शेतातील झटका मशीनसुद्धा चोरट्यांनी लंपास केली आहे.आधीच पावसाने खामगाव तालुक्यात दडी मारल्याने सोयाबीन उत्पादन संकटात आले असून, त्यातच चोरट्यांच्या धुमाकुळामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणी ठाकरे यांनी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.