रागाच्या भरात घरमालकाचे साहित्य फोडले; भाडेकरूवर गुन्हा दाखल! खामगावची घटना
Jun 7, 2025, 13:39 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाडेकरू तरुणाने रागाच्या भरात घरमालकाच्या घरातील साहित्याची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी खामगाव शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात संबंधित भाडेकरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घाटपुरी येथील इंदिरा कॉलनीतील रहिवासी कैलास सिताराम गव्हांदे (वय ४७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आंबेडकर नगरमधील त्यांच्या खोलीत राहणारा भाडेकरू मंगेश रामेश्वर साळवे (वय २६, रा. कोळेगाव, ता. जाफ्राबाद, जि. जालना, सध्या रा. सिध्दार्थ नगर, चिखली) याने ५ जून रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास रागाच्या भरात खोलीत ठेवलेले फ्रिज, शोकेस, मिक्सर, पलंग व इतर घरगुती साहित्याची मोडतोड केली.
या तोडफोडीत गव्हांदे यांचे सुमारे २३ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात मंगेश रामेश्वर साळवे याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३२७ (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.