अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीकडे दुर्लक्ष भोवले; मंडळ अधिकारी, तलाठी निलंबित; जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांचा दणका...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात कारवाई न करता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचा भंग केल्याप्रकरणी देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील मंडळ अधिकारी के.बी. ईप्पर, दिग्रस येथील तलाठी/ग्राम महसूल अधिकारी के.एल.खरात यांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी निलंबन आदेश जारी केले आहे.
त्याचबरोबरीने अवैध वाळूचा साठा केल्याबद्दल दिग्रस येथील उमेश पराड, धनंजय मिसाळ, रविंद्र लाड, भरत पराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
देऊळगांव राजा तालुक्यातील दिग्रस, देऊळगाव मही येथे प्राप्त तक्रारीवरून विशेष तपासणी पथकाने प्रत्यक्ष भेट दिली असता या भागात अवैध वाळू साठा आढळूण आला. याबाबत ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी यांनी त्यांच्या साजाअंतर्गत होणाऱ्या अवैध रेती उत्खन्ननाची कोणतीही माहिती तहसिलदार अथवा उपविभागीय अधिकारी अथवा जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली नाही तसेच याबाबत स्वःतच्या स्तरावर कोणतीही कारवाई केली नाही किंवा पोलीसाकडे तक्रार नोंदविली नाही.
यावरून गैरहेतुने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे मंडळ अधिकारी के.बी. ईप्पर, दिग्रस येथील तलाठी/ग्राम महसूल अधिकारी के.एल.खरात यांच्या विरोधात महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमाचा भंग केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी निलंबित केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.