महसूल विभागाच्या कारवाईनंतरही अवैध उत्खनन जाेरात; पिंपळगाव कुडा येथे तीन ट्रॅक्टर केले जप्त!

 
 सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : रेतीचे उत्खनन करून अवैध वाहतुक करणाऱ्यांवर महसूल विभागाच्या वतीने नियमीत कारवाई करण्यात येत आहे. मात्र, त्यानंतरही सिंदखेड राजा तालुक्यात रेतीचे उत्खनन करून वाहतुक सुरूच आहे. पिंपळगाव कुडा येथे रेतीची वाहतुक करणारे तीन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने बुधवारी जप्त केले. 

 तहसीलदार अजित दिवटे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. जप्त केलेली वाहने पुढील कारवाईसाठी किनगाव राजा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. या कारवाईत मंडळ अधिकारी वानखेडे, ग्राम महसूल अधिकारी प्रदीप मोगल, सानप, निकम, झीने, साळवे, जायभाये तसेच महसूल सेवक मदन वायाळ, संतोष गायकवाड आणि राजू खरात यांनी सहभाग घेतला.