खामगावजवळ ८८ लाखांचा बेकायदेशीर गॅससाठा जप्त; टँकरमधून गॅस चोरीचे आंतरराज्यीय रॅकेट उघड!

 
खामगाव (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वर अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई करत टँकरमधून बेकायदेशीररीत्या एलपीजी गॅस काढून व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत टँकर, गॅस सिलिंडर्स आणि अत्याधुनिक उपकरणांसह सुमारे ८८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील भडोच येथून अकोला जिल्ह्यातील कारंजाकडे एलपीजी गॅस घेऊन जाणारा टँकर खामगावजवळील राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलजवळ थांबला होता. चालकाने हॉटेलमध्ये थांबल्याचा आभास निर्माण करून टँकर शेजारील एका पडीक इमारतीत नेला. तेथे टँकरचे अधिकृत सील तोडून अत्याधुनिक मोटर पंप आणि विशेष पाईपच्या सहाय्याने गॅस बेकायदेशीररीत्या काढला जात होता. हा गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून काळ्या बाजारात विक्रीसाठी पाठविण्याचा प्रकार सुरू असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

राज्यस्तरीय दक्षता पथकाचे प्रमुख चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी अचानक धाड टाकून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला. कारवाईदरम्यान टँकर चालकासह आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून एलपीजी टँकर, मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर्स, मोटर पंप आणि इतर साहित्य असा सुमारे ८७ ते ८८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणामागे कार्यरत असलेले मुख्य सूत्रधार कोण आहेत, या रॅकेटचे जाळे किती मोठे आहे आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून सुरू असून, या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.