अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे जोमात; बीट जमादाराचे अभय? एसपी पानसरेंना निवेदन; एकतर बडतर्फ करा नाहीतर बदली करा...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे बिनधास्त सुरू आहे..पोलिसांचा कोणताही वचक नाही..एवढेच नाही तर साक्षात पोलिस अंमलदारच अवैध धंद्याचे पाठीराखे असून तेच अवैध धंद्यांना अभय देत आहेत असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते कार्तिक खेडेकर व विठ्ठल खेडेकर यांनी केला आहे. तशा आशयाचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांना देण्यात आले आहे. पोलिस अंमलदार सिद्धार्थ सोनकांबळे यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी नाहीतर त्यांची बदली करावी अशी मागणी एसपी पानसरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
   अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट आहे. दारू, वरली, मटका,अवैध रेती वाहतूक आदी धंदे जोरात सुरू आहेत. गावकऱ्यांनी वेळोवेळी अंढेरा पोलिसांना याबाबत अवगत करून देखील कारवाई झाली नाही. अवैध धंदे कमी न होता वाढतच गेले आहेत.खुल्या दारू विक्रीने महिला व शाळकरी मुलींना दारुड्यांचा त्रास होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दारूमुळे अपघाताचे प्रमाण वाढून अनेकांचे संसार उघड्यावर आल्याचेही निवेदनात म्हटले आहे. पोलिस अंमलदार सिद्धार्थ सोनकांबळे यांच्या अभयामुळेच अवैध धंदे सुरू असल्याचा थेट आरोप निवेदनात केला आहे. त्यामुळे सिद्धार्थ सोनकांबळे यांची आठ दिवसांत बदली करावी किंवा त्यांना बडतर्फ करावे नाहीतर अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे..