"तू वर्गणी दिली नाही तुला आरतीचा मान नाही..." देऊळगावराजात गणपतीसमोर एकाला चाकूने खुपसले!

 
देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देशभरात सगळीकडे गणेशोत्सव आनंदात साजरा होत आहे. मात्र देऊळगाव राजा येथे आरतीच्या मानपानावरून राडा झाला. "तू वर्गणी दिली नाही तुला आरतीचा मान नाही" असे म्हणत एकाला गणपती समोरच चाकूने भोसकण्यात आले. १० सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेतील आरोपींना आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 देऊळगाव राजा शहरातील शिवाजी नगरात पूर्वमुखी गणेश मंडळात हा राडा झाला. बाळू उर्फ परमेश्वर दत्तात्रय जाधव(३५, रा. शिवाजीनगर देऊळगाव राजा) याला चाकूने भोसकण्यात आले. जीवे मारण्याच्या उद्देशाने अंकुश घोंगे व इतर आरोपींनी बाळू वर हल्ला चढवला. अंकुश ने चाकूने सपासप वार केले. दरम्यान जखमी बाळू जाधव याच्यावर देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले त्यानंतर छत्रपती संभाजी नगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. 
 या प्रकरणाची तक्रार बाळू जाधव यांच्या भावाने देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाजी विठ्ठल घोंगे, कविता अंकुश घोंगे यांना याआधीच अटक करण्यात आली होती. आता फरार असलेला मुख्य आरोपी अंकुश घोंगे याला देखील अटक करण्यात आली आहे.