पोलिस ठाण्यात जाऊन पोलीसाचीच पकडली कॉलर! म्हणे, "मी राजकीय व्यक्ती..तुमची वाट लावतो....!" लोणार पोलिस ठाण्यात काय घडलं? कोण आहे तो पुढारी?

 
लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे..एकाने चक्क पोलीस कर्मचाऱ्याशीच हुज्जत घातली. पोलिसाची कॉलर पकडली.. "मी कोण आहे तुम्हाला माहित नाही का, मी राजकीय व्यक्ती आहे..तुमची वाट लावतो" अशी धमकीही त्याने पोलिस कर्मचाऱ्याला दिली.. काल,४ एप्रिलला हा धक्कादायक अन् तेवढाच संतापजनक प्रकार समोर आला आहे..

 

Pawar
Advt 👆
 
लोणार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कॉन्स्टेबल विशाल मधुकर धोंडगे यांच्या तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून कॉलर पकडणाऱ्याचे नाव आकाश रामेश्वर डोळे असे असून तो पांग्रा डोळे येथील राहणारा आहे. काल आकाश डोळे लोणार पोलीस ठाण्यात आला होता. ठाणेदार निमिष मेहेत्रे यांच्याशीही तो जोरजोरात बोलत होता. "मी आधी निवेदन दिले होते त्यावर काय कारवाई केली" असे तो विचारत होता. यावर ठाणेदार मेहेत्रे यांनी "तुमचे म्हणणे लेखनिक विशाल धोंडगे यांना सांगा" असे कळवून ते पेट्रोलिंग करता निघून गेले होते. त्यानंतर आकाश डोळे हा ठाणेदार मेहत्रे यांचे रायटर (लेखनिक) विशाल धोंडगे यांच्याकडे गेला. मी दिलेल्या निवेदनावर काय कारवाई केली असे त्याने विशाल धोंडगे यांना विचारले. यावर "दोन मिनिटं थांबा मी तुम्हाला काय कारवाई केली याची सविस्तर माहिती देतो, मला एक पत्र जावक करू द्या" असे धोंडगे यांनी डोळे याला सांगितले.
कॉलर पकडली...
या प्रकरणानंतर आकाश डोळे याने विशाल धोंडके यांच्या हातातील कागदपत्रे हिसकावून घेऊन फेकून दिले. धोंडगे यांच्या शर्टची कॉलर पकडली. या झटापटीत धोंडगे यांच्या शर्टचे बटन तुटले. यावेळी ठाणे अंमलदार व त्यांच्या मदतीसांनी आकाश डोळे याला पकडले.तरीही डोळे जोरजोरात बोलत होता. "मला सोडा.. तुम्हाला माहित नाही मी कोण आहे..मी राजकीय व्यक्ती आहे, तुमची वाट लावतो" अशी धमकी त्याने दिली असल्याने तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे आकाश डोळे याने यापूर्वी देखील लोणार पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांना मारहाण केलेली आहे, शिवाय पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करणे त्याचे नेहमीचेच असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी आकाश डोळे विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत..
कोण आहे आकाश डोळे...
आकाश डोळे हा लोणार तालुक्यातील पांग्रा डोळे गावचा उपसरपंच आहे. याआधी तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित होता..आता तो लोकशाही पार्टीचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे..