पुतणीच्या लग्नासाठी कपडे खरेदी करायचा निघाले होते..पण नियतीच्या मनात वेगळचं होत! करडी फाट्यावर काळ आला.....
Dec 13, 2024, 08:43 IST
धाड(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दोन दुचाकीमध्ये समोरा समोर धडक होऊन एक जण घटनास्थळीच ठार तर तीन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना काल, १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता बुलढाणा-छत्रपती संभाजी नगर रोडवर असलेल्या करडी फाट्यानजीकच्या हॉटेल राजलक्ष्मी समोर घडली. या प्रकरणी धाड पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावळी (ता. बुलढाणा) येथील रहिवासी विलास किसन वाघ (वय ४५ वर्षे) यांचे करडी फाट्यानजीक हॉटेल राजलक्ष्मी समोर कृषी केंद्र आहे. काल,१२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता विलास वाघ आपल्या पत्नीसह दुचाकीन करडी येथील दुकानवर आले होते. पुतनीच्या लग्नासाठी कपडे खरेदी करण्यासाठी त्यांना धाडला जायचे होते. मात्र, दुचाकीमध्ये पेट्रोल कमी असल्याने वाघ पेट्रोल भरण्यासाठी लगतच्याच भोंडे पेट्रोल पंपावर निघाले. त्यावेळी एमएच-२१-बीपी-५८६६ क्रमांकाच्या दुचाकीवर स्वार होऊन येणाऱ्या आरोपी राहुल भिमसिंग उसारे (वय ३०) रा. चांडोळ याने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून वाघ यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती, की विलास वाघ यांच्या डोक्याला व अन्य ठिकाणी गंभीर मार लागुन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. सोबतच उसारे यांच्या मोटारसायकलवर स्वार असलेले अनिल कुटुंबरे व गोदाबाई संजय धनावत किरकोळ जखमी झाले.
अपघात घडल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन एका खाजगी वाहनातून वाघ यांना तत्काळ उपचारकामी रुग्णालयात भरती केले. मात्र, उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषीत केले. या प्रकरणी स्वप्नील रामेश्वर वाघ यांनी धाड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी राहुल भिमसिंग उसारे याच्या विरुध्द भारतीय न्याय संहिताचे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब), १०६ (१), १८४ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार आशिष चेचेरे यांच्या मार्गदर्शनात धाड पोलीस करीत आहेत.