मुलगा पाहिजे होता पण मुलगी झाली! निर्दयी बापाने ७ महिन्यांच्या चिमुकलीला भिंतीवर फेकले! बुलडाणा शहरातील घटना
May 14, 2025, 08:58 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा शहरात धक्कादायक घटना घडली आहे. मुलगी झाल्याच्या रागातून निर्दयी बापाने ७ महिन्यांच्या चिमुकलीला भिंतीवर फेकले. पत्नीला देखील मारहाण केली. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून तिच्या पतीसह सासू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाणा शहरातील तानाजी नगर भागात ही घटना घडली.
प्रीती मनोज काकडे (२४) या महिलेने या प्रकरणाची तक्रार दिली आहे. घटनेच्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता पती मनोज याचा पत्नीशी शुल्लक कारणावरून वाद झाला. या वादात पतीने शिवीगाळ केली. मुलगा हवा असताना मुलगी का झाली? असे म्हणत लाथा बुक्क्यांनी पत्नीला मारहाण केली.
तसेच सात महिन्यांच्या ओजस्वीला पकडून भिंतीकडे फेकले, यात चिमुकलीच्या डोक्याला मार लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सासूने देखील आपल्याला केस पकडून मारहाण केली आणि मुलीला जीवाने मारून टाकण्याची धमकी दिली असेही तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे...