‘तुझ्याशी लग्न करतो, मुलालाही सांभाळतो’... विश्वास संपादन करून विधवा महिलेवर अत्याचार; आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल...

 
 शेगाव : (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पतीच्या निधनानंतर माहेरी राहत असलेल्या ३० वर्षीय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी निलेश बाळू तायडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे लग्न २०१३ मध्ये झाले होते. २०१५ मध्ये पतीचे निधन झाल्यानंतर ती आपल्या १२ वर्षीय मुलासह राहत होती. याचदरम्यान गावातील निलेश बाळू तायडे याने तिच्याशी जवळीक साधली. तिची तसेच मुलाची विचारपूस करून ‘तुझ्याशी लग्न करतो आणि मुलाला सांभाळतो’, असे सांगत तिचा विश्वास संपादन केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

गेल्या ऑगस्ट महिन्यात आरोपीने महिलेला भोनगाव येथे आपल्या घरी नेले. तेथे लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. तसेच लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीकडून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तिने पोलिसांना सांगितले.

या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी आरोपी निलेश तायडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ६९, ३५२, ३५१(२)(३) अन्वये झिरो गुन्हा क्रमांक ०३/२०२६ दाखल केला आहे. घटनास्थळ शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील तपास शेगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.