सैलानीला गेले होते दर्शनाला! परत जातांना मेहकरमध्ये समृध्दी महामार्गाचा रस्ता विचारला अन् चुकीचं घडलं.....

 
 (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) सैलानी येथून दर्शनानंतर परत जात असताना वाशिम येथील भाविकांना चार जणांनी मारहाण करुन सोनसाखळी लंपास केली. ही घटना मेहकर शहरातील शितला माता मंदीराजवळ ४ एप्रिलच्या उत्तररात्री घडली. याप्रकरणी तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
  अमोल प्रभाकर जोगदंड असे तक्रारदाराचे नाव आहे. अमोल जोगदंड हे आपल्या तीन मित्रांसह त्यांच्या कारने वाशिम जिल्ह्यातील गोंदेश्वर येथून पिंपळगांव सराई येथे सैलानी बाबांच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर घराकडे परत जात असताना मेहकर शहरावजळ ते पोहोचले. मेहकर शहरातील शितला माता मंदीर परिसराजवळ पोहोचल्यानंतर त्यांना तीन चार मुले दिसली. त्यांच्याजवळ जावून समृद्धी महामार्गावरून जाण्याचा मार्ग कोणता असे त्यांनी विचारले असता, एका युवकाने "माझ्याकडे काय पाहतो?" असे म्हणत त्यांच्या गालावर चापट मारली. त्यानंतर ते गाडीच्या खाली उतरले. चार युवकांसोबत त्यांची झटापट झाली. एकाची कॉलर पकडली असता, ‘तुला माहिती नाही तू कोणाची कॉलर धरली, सचिन मापारी म्हणतात’ असे म्हणत एकाने अमोल जोगदंड यांना शिवीगाळ करित चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी त्यांच्या शरीरातून रक्त निघाले. सोबतच्या मित्रांनी त्यांची सोडवणूक केली. दरम्यान, गळ्यातील सोनसाखळी लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले, असे त्यांनी मेहकर पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारीनुसार, पोलिसांनी सचिन मापारी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मेहकर पोलीस करित आहेत.