“दारू सोडतो, सुखात ठेवतो…” म्हणाला अन् दोन दिवसांतच संसाराचा अंत! संशयी नवऱ्याने दोरीने गळा आवळून पत्नीला संपवले; दोन चिमुकल्यांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले, किनगावराजात खळबळ!

 
किनगाव राजा:  (निलेश डीघोळे बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : २०२१ मध्ये लग्न.. दारू प्यायचा, बायको फोनवर बोलत असली की तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा..! दोन दिवसांपूर्वी म्हणे, “सगळं सोडतो, तुला सुखात वागवीन..!” अन् आज गळा आवळून केला बायकोचा खून..! दोन चिमुकल्यांना आईच्या मायेपासून कायमचे पोरके केले..! सिंदखेडराजा तालुक्यातील किनगाव राजा येथे आज, २२ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या धक्कादायक घटनेने परिसर सुन्न झाला आहे. संजीवनी विजय दाभाडे (वय २३) असे मृत विवाहितेचे नाव असून, विजय संजय दाभाडे (वय ३१) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. दारूचे व्यसन आणि पत्नीच्या चारित्र्यावर घेतला जाणारा संशय यामुळे या संसारात वारंवार वाद होत असल्याची माहिती मृत विवाहितेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी किनगाव राजा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आहे.

 

दोन दिवसांपूर्वी सुखात ठेवण्याचे आश्वासन; आज संसाराचा दुर्दैवी शेवट!

प्राप्त माहितीनुसार, संजीवनी हिचा विवाह २०२१ मध्ये विजय दाभाडे याच्याशी झाला होता. मात्र, संसारात सर्व काही सुरळीत नव्हते. पतीला दारू पिण्याची सवय होती, तसेच संजीवनी कोणाशी फोनवर बोलत असली तरी तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जात असल्याचे तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या कारणांवरून दोघांमध्ये वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे.
कौटुंबिक आयुष्यातील हे वाद मिटून संसार पुन्हा सुरळीत व्हावा, अशी अपेक्षा असतानाच दोन दिवसांपूर्वी पतीने दारू सोडून सुखात वागविण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच या संसाराचा असा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

गुरुवारी सकाळी सहा वाजण्यापूर्वीची घटना; दोरीने गळा आवळल्याची तक्रार...

२२ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजण्यापूर्वी राहत्या घरात संजीवनी हिचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आल्याची फिर्याद तिचे वडील सुधाकर विठोबा वाघमारे (वय ५५, रा. हिवरखेड, ता. सिंदखेडराजा) यांनी किनगाव राजा पोलीस ठाण्यात दिली.या तक्रारीच्या  आधारे पोलिसांनी विजय संजय दाभाडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

किनगाव राजा पोलिसांची तत्पर कारवाई; आरोपी पतीला अटक

गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार केले. तपासादरम्यान आरोपी विजय संजय दाभाडे याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले आणि अटक करण्यात आली. या घटनेमुळे किनगाव राजा तसेच परिसरात खळबळ उडाली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दोन चिमुकल्यांच्या आयुष्यातून आईची माया हरपली!

या घटनेतील सर्वांत वेदनादायी बाब म्हणजे, संजीवनीच्या मृत्यूमुळे तिच्या दोन लहान मुलांच्या आयुष्यातून आईची माया हरपली आहे. आईच्या प्रेमाची आणि मायेची गरज असलेल्या या चिमुकल्यांवर काळाने मोठा आघात केला आहे. कौटुंबिक वाद, व्यसन आणि संशयाचे रूपांतर इतक्या टोकाच्या घटनेत झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन टोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर यांच्यासह पोलीस कर्मचारी अनिल नागरे, सुभाष गिते, संदीप डोंगरे, गणेश वारकरी, मिलिंद सोनपसारे आणि इतर कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.दारूचे व्यसन, संशय आणि कौटुंबिक वाद यांची परिणती एका तरुण विवाहितेच्या मृत्यूत झाली. आता या प्रकरणाचा पुढील तपास काय निष्पन्न करतो, याकडे लक्ष लागले आहे.