रस्त्यात अडवून सोने लुटणारा भामटा पकडला! बुलडाणा LCB ची पुन्हा दमदार कारवाई... सिंदखेडराजात झाले होते मॅटर...

 
Lcb
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ४ सप्टेंबर रोजी ज्या लुटमारीच्या घटनेमुळे सिंदखेडराजा शहर बंद ठेवण्यात आले होते, त्या घटनेतील आरोपीला गजाआड करण्यात LCB ला यश आले आहे. राम उर्फ राजू बिरजू भोसले असे आरोपीचे नाव असून तो अवघ्या २० वर्षांचा आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली. 
  प्राप्त माहितीनुसार देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका आजीला अडवून दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी लुटले होते. १ सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेत आजीच्या हातातील चांदीच्या पाटल्या,कानातील सोन्याची फुले,गळ्यातील सोन्याची पोथ असा मुद्देमाल लांबवला होता. याप्रकरणी आजीच्या तक्रारीवरून सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेसह सातत्याने होणाऱ्या घरफोडींच्या घटनांचा निषेध म्हणून ४ सप्टेंबर रोजी सिंदखेडराजा शहर बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान प्रकरण LCB ने गांभीर्याने घेतले. गोपनीय माहितीच्या आधारावरून आरोपी राम भोसले याला बेड्या ठोकल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आणखी ४ गुन्ह्यांची कबुली दिली. दोन गुन्हे सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात तर दोन गुन्हे मेहकर पोलीस ठाण्यात दाखल होते. आरोपीच्या ताब्यातून एक ४२ हजार रुपयांची सोन्याची पोथ व एक मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्या चौकशीतून आणखी त्याच्या साथीदाराची माहिती देखील निष्पन्न झाली आहे.
यांनी केली कारवाई...
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशाने टीम "एलसीबी"तील पोलीस उपनिरीक्षक रवि मोरे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप (सिंदखेडराजा पोलीस स्टेशन), पोहेकॉ राजेंद्र अंभोरे, पोना युवराज राठोड, पोकॉ दिपक वायाळ यांनी केली.