

पती पत्नी घरात झोपलेले; मध्यरात्री अघटीत घडलं! पाठीमागच्या दारातून.....! खामगाव तालुक्यातील वझर ची घटना
Apr 22, 2025, 10:31 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील वझर गावात घरफोडीची घटना घडली आहे. विशेष म्हणजे घरात पती-पत्नी झोपलेली असताना मागच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून चोरटे घरात शिरले, घरातील मौल्यवान वस्तू ठेवण्याची पेटीच चोरट्यांनी लांबवली.. याप्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वझर येथील मनीष भिवाजी वाकोडे (३०) यांनी या प्रकरणाची तक्रार दिली. ते गावात ट्रॅक्टर चालवून व शेतात काम धंदा करून उदरनिर्वाह करतात. यातून मिळालेले पैसे बचत म्हणून घरात ठेवतात. घरात पती-पत्नी झोपलेले होते, पहाटे ३ वाजता त्यांना जाग आली असता घराचे पाठीमागचे दार उघडे दिसले. दाराचा कडी कोंडा तुटलेला होता. मागच्या खोलीमधील मौल्यवान वस्तू व पैसे ठेवण्याची लोखंडी पेटी गायब दिसली, घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. मनिष वाकोडे यांनी लगेच ११२ वर कॉल केला, थोड्याच वेळात हिवरखेड पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला. घरातून चांदीचे जोडवे, गळ्यातील १३ सोन्याचे मनी व रोख २० हजार रुपये थोरल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली. याच वेळी शेजारी राहणाऱ्या अक्षय विलास तिडके व तेजराव सदाशिव वाकोडे यांच्या घरात सुद्धा चोरट्याने चोरीचा प्रयत्न केल्याच्या समोर आले आहे.