नवऱ्याच्या गळ्याला चाकू, डोळ्यांसमोर पत्नीवर सामूहिक अत्याचार... बुलडाणा हादरवणाऱ्या प्रकरणात मोठी हालचाल; एसपी तांबे स्वतः मैदानात, आरोपींच्या शोधासाठी बुलडाणा पोलिसांची ५ विशेष पथके रवाना!
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेसह मलकापूर ग्रामीण पोलीस ठाणे, मलकापूर शहर पोलीस ठाणे आणि दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली पाच स्वतंत्र पथके विविध दिशांनी आरोपींचा शोध घेत आहेत. घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज, मोटारसायकलींची हालचाल तसेच संशयितांच्या हालचालींची कसून पडताळणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या प्रकरणात पीडित दांपत्याने दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री दोन अज्ञात आरोपींनी घराचा दरवाजा फोडून प्रवेश केला. चाकू आणि विळ्याचा धाक दाखवत त्यांनी लुटमारीचा प्रयत्न केला. त्यानंतर पती-पत्नीला जबरदस्तीने शेतात नेण्यात आले. तेथे पतीच्या गळ्याला चाकू लावून त्याला जीवे मारण्याची धमकी देत पत्नीवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अत्याचारानंतर दोन्ही आरोपी मोटारसायकलवरून पसार झाले.
या घटनेनंतर मलकापूर ग्रामीण पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून, फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथकाच्या मदतीने घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. आरोपींची ओळख अद्याप पटलेली नसली तरी तपास यंत्रणांनी विविध धागेदोरे तपासण्यास सुरुवात केली आहे.
या संतापजनक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संतापाची भावना व्यक्त होत असून, आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनीही आरोपींना लवकरच अटक करण्यात यश येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.