शेतरस्त्याच्या वादातून पती,पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला; दोघांविरुध्द गुन्हा दाखल !
Nov 27, 2025, 12:03 IST
सुनगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेताच्या रस्त्यावरून सुरू असलेल्या वादातून सुनगाव येथे २५ नोव्हेंबर रोजी सकाळी झालेल्या हल्ल्यात पती–पत्नीवर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात गणेश पाटील आणि त्यांची पत्नी प्रभा पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
प्रभा गणेश पाटील यांनी जळगाव जामोद पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा शेतरस्त्यावरील मार्गाबाबत पंकज श्रीकृष्ण भगत (वय ३०) आणि त्याचे वडील श्रीकृष्ण भगत (वय ५०), दोन्ही रा. सुनगाव, यांच्यासोबत पूर्वीपासून वाद सुरू आहे.२५ नोव्हेंबर रोजी सकाळी साधारण ७.४५ ते ८ वाजताच्या दरम्यान प्रभा पाटील आणि त्यांचे पती बैलबंडी घेऊन शेतात जात असताना, पंकज भगत हा हातात कुऱ्हाड घेऊन रस्त्यात उभा होता. पाटील दाम्पत्य रस्त्याच्या कडेला जात असताना पंकज भगत याने अचानक त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. दोघांच्या पाठीवर आणि छातीवर घाव घातल्याने ते गंभीर जखमी झाले.यावेळी आरोपी श्रीकृष्ण भगत यानेही दोघांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. जखमी दाम्पत्याला स्थानिक उपचारानंतर अकोला येथे हलविण्यात आले.प्रभा पाटील यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी कलम १०९ (१), ३५१ (३), ३ (५) बी.एन.एस. नुसार गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास ठाणेदार यांच्या आदेशानुसार सुपोनि नागेश मोहोड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
