‘आणखी किती दिवस विना नवऱ्याची राहते?’ म्हणत विधवेचा विनयभंग; खामगाव शहरातील घटना !

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ‘आणखी किती दिवस विना नवऱ्याची राहते?’ असे म्हणत ३६ वर्षीय विधवेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना खामगाव शहरात उघडकीस आली आहे.
खामगाव शहरातील चांदमारी भागातील विनोद सुरेश तासतोडे (वय ३५) हा तरुण संबंधित विधवा महिलेच्या किराणा दुकानावर नेहमी येत असे. १५ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे सहा वाजताच्या दरम्यान तासतोडे हा पीडितेच्या किराणा दुकानावर गेला. त्यानंतर त्याने पीडितेच्या घरात प्रवेश करून वाईट उद्देशाने तिचा हात धरत ‘आणखी किती दिवस विना नवऱ्याची राहणार?’ असे म्हणत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी कोणाला काही सांगितल्यास तुझ्या कुटुंबाला जीवे मारून टाकीन, अशी धमकी देत त्याने शिवीगाळ केल्याचे पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी पीडित महिलेने खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संतोष गव्हाळे करीत आहेत.