थरार..! चिखली ते जालना, दरोडेखोरांचा सिनेस्टाईल पाठलाग! नांगरलेल्या शेतातून ३ किमी दरोडेखोरांच्या मागे धावले पोलीस; ५ दरोडेखोर जेरबंद; चिखलीच्या हॉटेल राजवाड्याजवळ झाली लूट...
May 2, 2026, 15:16 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ठिकाण मेहकर फाट्यावरील हॉटेल परिसर.. एक मे रोजी च्या दुपारच्या उन्हात एक व्यवहार ठरणार होता… पण काही मिनिटांतच तो भीषण दरोड्यात बदलला. आणि त्यानंतर सुरू झाला पोलिसांचा थरारक पाठलाग — अगदी चित्रपटालाही लाजवेल असा!
नांदेड येथील चंद्रशेखर स्वामी यांना “रत्न” विक्रीचे आमिष दाखवत चिखलीतील हॉटेल राजवाडा परिसरात बोलावण्यात आले. खडा पसंत पडल्यावर व्यवहार ठरणार इतक्यात, अचानक वातावरण बदलले. समोर उभे असलेलेच, म्हणजेच खडा विकणारे लोक दरोडेखोर बनले! चापटा, बुक्के आणि काठ्यांनी बेदम मारहाण करत त्यांनी सोनं-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल ४.८९ लाखांचा मुद्देमाल लुटला… आणि क्षणार्धात पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेने युद्धपातळीवर तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार झाले. दरम्यान, गुप्त माहिती मिळाली—एक आरोपी साकेगावमध्ये, तर उर्वरित जालना दिशेने फरार!
इथून सुरू झाला खरा “सिनेस्टाईल” खेळ…
कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात नाकाबंदी उभारली गेली. साकेगावमधून एक आरोपी जेरबंद झाला. पण बाकीचे चार आरोपी पोलिसांच्या हातातून सुटण्यासाठी जालन्याच्या दिशेने फरार झाले.. पोलिसांनीही हार मानली नाही — सुसाट पाठलाग केला.. पोलिसांना चकवा देण्यासाठी दरोडेखोर नांगरलेल्या शेतातून पायी धावू लागले..तरीही तब्बल ३ किलोमीटर शेतातून जीव तोडून पाठलाग करत अखेर सर्वांना पकडले!
ही संपूर्ण कारवाई केवळ २४ तासांत पूर्ण झाली. अटक आरोपींकडून सोन्याच्या अंगठ्या, कुंडले, चांदीचे कडे, ब्रासलेट, चैन, तसेच रोख रक्कम असा एकूण ४.८० लाखांचा मुद्देमाल शंभर टक्के हस्तगत करण्यात आला.
हे धाडसी ऑपरेशन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर (स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा) यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे (पोलीस ठाणे अंढेरा), उपनिरीक्षक प्रताप बाजड, दिनेश घुगे, तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे, शरद गिरी, पुरुषोत्तम आघाव, वनिता शिंगणे, सिद्धार्थ सोनकांबळे, भरत पोफळे, राजू आडवे (तांत्रिक विश्लेषण विभाग) यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल मनोज खरडे, अमोल अंभोरे, पूजा जाधव, किशोर जाधव, श्रीकांत पव्हरे, विकास देशमुख आदींचा सक्रिय सहभाग होता.