भानापूरजवळ भीषण तिहेरी अपघात! मोटारसायकली समोरासमोर धडकल्या; मोटरसायकलवरील महिलेला मागून आलेला क्रेनने चिरडले.... महिलेचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

 
 सुलतानपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):छत्रपती संभाजीनगर–नागपूर राज्य महामार्गावरील भानापूर परिसरात सोमवारी सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यानंतर भरधाव क्रेनने दिलेल्या धडकेमुळे हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवरा खंड येथील तसलीम रमजान परसुवाले (वय ३५) हे आपल्या आई बानुबाई रमजान परसुवाले (वय ५५) यांच्यासह दुचाकी (क्र. एमएच २८ बीएम ४९०) वरून दूध व्यवसायाच्या कामानिमित्त सुलतानपूरकडे जात होते. त्याचवेळी सुलतानपूरकडून छत्रपती संभाजीनगरकडे लक्ष्मण दामोधर मानवतकर (वय ३४) हे दुचाकी (क्र. एमएच २८ सीजी १३५०) ने प्रवास करत होते.

भानापूरजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, बानुबाई परसुवाले या रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या क्रेनचे मागील चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. संबंधित क्रेनचा क्रमांक एमएच २८ एझेड ९१४४ असल्याची माहिती समोर आली आहे.

या अपघातात तसलीम परसुवाले आणि लक्ष्मण मानवतकर हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने मेहकर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.दरम्यान, मृत बानुबाई परसुवाले यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.