मध्यरात्री भीषण अपघात! दुचाकी डिव्हायडरवर आदळली; हिंगणा शिवारातील ५५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू! खांडवी–हिंगणा मार्गावर काळाचा घाला; रात्री घरी परतताना घडली दुर्दैवी घटना

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोद तालुक्यातील हिंगणा शिवारातील ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मध्यरात्री भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. खांडवी येथून स्वतःच्या शेतातील घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीचा डिव्हायडरला जोरदार धक्का बसल्याने हा अपघात झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, मुरलीधर गोवर्धन सुरडकर (वय ५५, रा. हिंगणा शिवार, ता. जळगाव जामोद) हे ४ ऑगस्टच्या रात्री साडेआठ वाजता त्यांच्या होंडा युनिकॉर्न (एमएच-२८-सीए-६३९३) या दुचाकीने वैयक्तिक कामानिमित्त खांडवी येथे गेले होते.दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे २.४० वाजता झाडेगाव येथील पोलिस पाटील यांनी मयताचे भाऊ विद्याधर सुरडकर यांना फोन करून मुरलीधर सुरडकर यांच्या दुचाकीचा झाडेगाव परिसरात डिव्हायडरला अपघात झाल्याची माहिती दिली.

माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी मुरलीधर सुरडकर हे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावली. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, जळगाव जामोद येथे दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

प्राथमिक माहितीनुसार, खांडवीहून हिंगणा शिवारातील घरी परतत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन डिव्हायडरवर आदळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.