भीषण अपघात! धाड येथे एसटी बसखाली चिरडून तिघांचा जागीच मृत्यू; करडी (धाड) पुलावर दुचाकी–एसटीची समोरासमोर धडक; परिसरात शोककळा...

 
धाड (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): छत्रपती संभाजीनगरकडून धाडकडे येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसखाली चिरडल्याने तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची भीषण दुर्घटना आज ५ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ४.५० वाजता करडी (धाड) येथील पुलावर घडली. अपघाताची तीव्रता इतकी प्रचंड होती की एकाचा गंभीर जखमी अवस्थेत मृत्यू झाला.

मलकापूर आगाराची एसटी बस क्रमांक MH-06-BW-3638 ही आज छत्रपती संभाजीनगरहून मलकापूरकडे जात होती. त्याच वेळी ढालसावंगी (ता. बुलढाणा) येथील अंकुश पाडळे, रवी चंदनशे व कैलास शिंदे हे तिघे दुचाकीवरून धाडहून करडीच्या दिशेने जात होते. करडी (धाड) पुलावर येताच एसटी बस व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीचा चुराडा होऊन ती थेट बसखाली अडकली. तिन्ही दुचाकीस्वारांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या दुर्दैवी घटनेमुळे ढालसावंगी गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.