

पोलीस निरीक्षकांच्या कारला मागून ठोकले; तीन चार पलट्या अन्....देऊळगावराजा जवळची घटना!
Dec 30, 2024, 09:17 IST
देऊळगाव राजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रस्त्यावर रोही आडवा आला..त्यांनी समयसूचकता दाखवत त्यांच्या कारचा वेग कमी केला..मात्र मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहणाने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता सरळ पुढील कारला मागून ठोकून दिले..अचानक झालेल्या या अपघातामुळे कारने तीन चार पलट्या घेतल्या..या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मिना हिवाळे(४५ ,बुलडाणा) या गंभीर जखमी झाल्या.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला..११ डिसेंबरला झालेल्या या अपघाताची तक्रार आता उशिरा देऊळगावराजा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..
याआधी बुलढाणा अँटीकरप्शन ब्युरो मध्ये उपअधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळलेले व सध्या मालेगाव येथे पोलीस निरीक्षक असलेले संजय चौधरी हॉस्पिटलच्या कामासाठी पत्नी, मुलगा, व बहिणीला घेऊन छत्रपती संभाजी नगरला गेले होते. हॉस्पिटलचे काम आटोपून परत येत असताना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास देऊळगावराजा जवळील जाफ्राबाद चौफुलीवर असलेल्या टर्निंग जवळ चौधरी यांच्या वाहनासमोर रोही आडवा आला.त्यामुळे चौधरी यांनी गाडीचा वेग कमी केला. तेवढ्यात पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने चौधरी यांच्या कारला मागील बाजूने धडक दिली.त्यामुळे कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या उताराच्या भागात जाऊन मोठ्या दगडांना टक्करली. कारने दोन चार पलट्या घेतल्या.. अपघातास कारणीभूत असलेले वाहन घटनास्थळावरून तात्काळ पसार झाले. अपघात भीषण होता मात्र सुदैवाने वाहन चालवत असलेले संजय चौधरी व त्यांच्या पत्नी सौ. मीना चौधरी यांनी सीटबेल्ट लावलेले असल्यामुळे एअर बॅग उघडल्या त्यामुळे ते केवळ किरकोळ जखमी झाले..
मात्र मागील सीटवर बसलेल्या संजय चौधरी यांच्या बहीण मिना हिवाळे या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे चौधरी कुटुंबाची मनस्थिती ठीक नसल्यामुळे व निधनानंतर उत्तर क्रियेचे कार्यक्रम असल्याने या प्रकरणाची तक्रार उशिरा देण्यात आली. या अपघाताप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे...