अहो ऐकलं का! आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटात आणखी एक बाळ; बुलडाण्याच्या सामान्य रुग्णालयात अजब घटना...पुढे काय झालं? वाचा...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात २८ जानेवारीला सकाळी एक अनोखी घटना समोर आली. नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेची सोनोग्राफी केली असता बाळाच्या पोटात आणखी अर्भक असल्याचे तपासणीत आढळून आले. नऊ महिन्यांच्या अर्भकाच्या पोटात साडेचार महिन्यांचे हे अर्भक आहे. 'फेटस इन फेटो' (अर्भकामध्ये अर्भक) असे या प्रकाराला म्हटले जाते. येथील जिल्हा महिला रुग्णालयामध्ये एक ३२ वर्षीय नऊ महिन्यांची गर्भवती महिला सोनोग्राफी करण्यासाठी आली होती. २८ जानेवारीला कर्तव्यावर असलेले स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद अग्रवाल यांनी महिलेची सोनोग्राफी केली. यावेळी गर्भात पूर्णतः वाढ झालेल्या अर्भकाच्या पोटामध्ये आणखी एक अर्भक असल्याचे लक्षात आले. ही बाब त्यांनी वरिष्ठांना कळविण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी व स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी तपासणी करून अचूक निदान करण्यात आले. रेडिओलॉजिस्ट डॉ सृष्टी थोरात यांच्याकडून या प्रकाराची पुष्टी करण्यात आली.

सातव्या महिन्यात केलेल्या सोनोग्राफीत तसे आढळले नव्हते, असे महिलेने डॉक्टरांना सांगितले. यापूर्वी महिलेचे दोनवेळा सिझर झाले आहे. गुणसुत्रांच्या समस्येमुळे असे घडू शकते, असे डॉक्टरांनी सांगितले.

पाच लाखांत एक घटना

या घटनेबाबत जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ.भागवत भुसारी  म्हणाले, ही घटना अतिविरळ प्रकरणातील आहे. गर्भ धारणेपासूनच अर्भकामध्ये अर्भक वाढीची सुरुवात होते. पाच लाख प्रसुतीमध्ये एक या प्रमाणात हा प्रकार आढळतो. आतापर्यंत दोनशेपेक्षा कमी केसेस या जागतिक पातळीवर नोंदविण्यात आल्या आहेत. त्यातील जास्तीत जास्त केसेस या प्रसूतीनंतर किंवा बाळाच्या जन्माच्या एक महिना किंवा एक वर्ष अथवा त्याहून अधिक काळानंतर नोंदविल्या गेल्या आहेत. प्रसूतीआधी पहिल्यांदा जगात १९८३ साली अशी घटना नोंदविली गेली होती. त्यानंतरच्या काळात मोजक्याच ठिकाणी अशा घटना समोर आल्याचे ते म्हणाले..


महिलेसह बाळाची प्रकृती उत्तम

बाळाच्या पोटातील अर्भकाची वाढ होत नाही. महिलेची आधी प्रसूती करावी लागेल. नंतर बाळाच्या पोटाची शस्त्रक्रिया करून ते अर्भक काढावे लागेल. या शस्त्रक्रियेदरम्यान 'त्या' बाळाला धोका उद्भवत नाही. यात घाबरण्याचे कारण नाही. महिलेसह नातेवाइकांचे समुपदेशन केले आहे. सिझेरियनकरिता महिलेस छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला आहे. सद्यस्थितीत महिला आणि तिच्या बाळाची प्रकृती चांगली असल्याचे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले...