वीरमरण! बांगलादेश सीमेवर दुसरबीड येथील जवान प्रदीप घुगे यांचे हृदयविकाराने निधन; दोन वर्षांनी होणार होती सेवानिवृत्ती...

 

 सिंदखेडराजा(बाळासाहेब भोसले:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र, येथील रहिवासी सीमा सुरक्षा बलाचे जवान प्रदीप पंढरीनाथ घुगे यांचे त्रिपुरा राज्यातील आगरतळा येथे बांग्लादेश सीमेवर कार्यरत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. २५ नोव्हेंबरला रात्री बाराच्या सुमारास घुगे यांना कर्तव्यावर वीरमरण आले. याची वार्ता समजताच दुसरबीडवर शोककळा पसरली.

३९ वर्षीय प्रदीप घुगे यांचा जन्म दुसरबीड येथे झाला. शालेय शिक्षण गावातच झाले. २००६ मध्ये बुलढाणा येथील बीएसएफ १२२ बटालियनच्या भरतीत जनरल ड्युटी (जीडी) मध्ये शिपाई पदावर त्यांची नेमणूक झाली. ३१ जुलै २०२४ रोजी प्रदीप घुगे गावी सुटीवर आले होते. ४५ दिवसांच्या रजेवर असताना त्यांनी कुटुंबीय, नातेवाइक, सगेसोयरे, मित्र मंडळींच्या भेटीगाठी घेतल्या. १९ सप्टेंबर रोजी आगरतळा येथे कर्तव्यावर हजर झाले बांग्लादेशच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना २५ नोव्हेंबरला रात्री १२ वाजता त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला.त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, आई, वडील, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.
दोन वर्षांनी होती निवृत्ती
दिवंगत प्रदीप घुगे यांची बीएसएफ सेवेची १८ वर्षे पूर्ण झाली होती. येत्या दोन वर्षांत ते सेवानिवृत्त होणार होते. मात्र, काळाने आधीच त्यांना सर्वांपासून हिरावून नेले. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
उद्या पोहोचणार पार्थिव
प्रदीप घुगे यांचा मृतदेह आगरतळा येथून कोलकाता, इंदूरमार्गे २८ नोव्हेंबरला दुसरबीड येथे आणला जाणार असल्याची माहिती मृत वीर जवान प्रदीप यांचे मामा माजी सैनिक अशोक वाघ यांनी दिली.