मुसळधार पावसाचा कहर! घराची भिंत कोसळून ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू...

 
 शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरात गुरुवारी सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांत पाणी साचल्याचे चित्र आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (३० जुलै रोजी) रात्री साडेआठच्या सुमारास शहरातील जुनी वस्ती फुलेनगर येथे घडली. मृत महिलेचे नाव सरस्वती गोटीराम पल्हाडे (वय ८५) असे आहे.

प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे संबंधित घराची भिंत कमकुवत झाली होती. रात्री अचानक भिंत कोसळल्याने घराजवळ असलेल्या सरस्वती पल्हाडे यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. त्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखालून त्यांना बाहेर काढण्यात आले; मात्र गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. या दुर्दैवी घटनेमुळे फुलेनगर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.