हृदयद्रावक! ४ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह; विवाहितेने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या! टाकरखेड वायाळ येथील घटना...

 
मेरा बु (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): टाकरखेड वायाळ (ता. अंढेरा) येथे मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास एका नवविवाहितीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. दिपाली वैभव बनसोडे (वय २५) असे मृत विवाहितीचे नाव असून, तिचा केवळ चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मिसाळवाडी (ता. अंढेरा) येथील रहिवासी गणेश प्रल्हाद साळवे यांची मुलगी दिपाली हिचा विवाह १९ एप्रिल २०२५ रोजी टाकरखेड वायाळ येथील वैभव बनसोडे यांच्याशी समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे झाला होता. विवाहानंतर ती पतीसह टाकरखेड वायाळ येथे वास्तव्यास होती.

मंगळवारी (५ ऑगस्ट) दुपारी दिपाली शेतात काम करण्यासाठी गेली होती. काही वेळाने तिने सोबतच्या महिलांना "शौचास जाते" असे सांगून जागा सोडली. बराच वेळ लोटूनही ती परत न आल्याने महिलांनी शोध सुरू केला. दरम्यान, जवळच्या विहिरीजवळ गेल्यावर पाण्यावर तरंगत असलेल्या चपला दिसून आल्या. संशय आल्याने महिलांनी आरडाओरडा करून गावकऱ्यांना बोलावले.

घटनेची माहिती अंढेरा पोलीस स्टेशनला तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम आणि बीट जमादार गजानन वाघ यांना देण्यात आली. पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.